मंगळवेढा कारागृहातून आरोपीचे पलायन;आरोपीविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढा कारागृहातून आरोपीचे पलायन;आरोपीविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथील सबजेल कारागृहातून चार पोलिसांची भर दिवसा नजर चुकवून चोरीच्या गुन्हयातील आरोपी दत्तात्रय मनगेनी मोटे (वय ३० ,रा .तनाळी ता.पंढरपूर) याने झाडाच्या फांदीचा आधार घेवून भिंतीवरून उडी मारून रविवारी सकाळी ९ . ०० वा . पलायन केल्याची घटना घडली.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेची हकिकत अशी,यातील आरोपी दत्तात्रय मोटे (रा .तनाळी) याला मोटर सायकल चोरी प्रकरणात मंगळवेढा पोलिसांनी दि.२९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तो सध्या मंगळवेढा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.कारागृहातील सर्व आरोपींना टप्याटप्याने शौचालयास व स्नानासाठी सबजेलमध्ये शौचालय नसल्याने बाहेर काढले होते. 

यावेळी गार्डवर असलेल्या चार पोलिसांनी नजर चुकवून त्याने एका झाडाच्या फांदीचा आधार घेवून जेलच्या स्लॅपवर चढला व भिंतीवरून सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडील इमारतीच्या बाजूस उडी मारून अर्धनग्न अवस्थेत पळून गेला.आरोपी पळाल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच गार्डवर असलेल्या पोलिसांची पळताभुई थोडी होवून घाम फुटला . या घटनेची माहिती डी.वाय.एस.पी दत्तात्रय पाटील व पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांना पोलिसांनी देताच हे घटनास्थळी दाखल झाले.


शहराच्या कडेला असलेल्या एका ऊसाच्या फडात या आरोपीने आश्रय घेतल्याचे पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिसांची जादा कुमक मागवून संपूर्ण ऊसाच्या फडाला गराडा घातला. एका पोलिस कर्मचाऱ्याने झाडावर चढून ऊसाच्या फडाची टेहाळणी केल्यानंतर आरोपी ऊसाच्या आड दडून बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान , पोलिस कॉन्स्टेबल अतुल खराडे यांनी आरोपी दत्तात्रय मोटे याच्याविरूध्द फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा