पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

 




टीम मंगळवेढा टाईम्स । विवाह नोंदणी कायद्यानुसार अल्पवयीन बालविवाह होणार असेल तर असा विवाह कायद्यानुसार प्रशासन रोखत असल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. 


पण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे विपरीतच घडले. विवाहासाठी नवरदेव अल्पवयीन असल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कायद्यानुसार विवाह रोखला.



बार्शी शहरातील एका प्रभागामध्ये एका तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आपण आयुष्यात यापुढे एकमेकांपासून विभक्त राहूच शकत नाही, अशी भावना दोघांमध्ये निर्माण झाली. अन्‌ त्या दोघांनी कुटुंबातील काही मोजक्‍या नातेवाइकांसमवेत विवाह करण्याचे नियोजन केले.


या प्रेमी युगुलाचा विवाह मंगळवारी (ता. 29) घरासमोर दारात करण्याचा मुहूर्त ठरला दुपारी तीन वाजता. नातेवाईक व मित्रमंडळी आशीर्वाद देण्यासाठी हजर झाली. आनंदाचा क्षण समीप आला तसा वधू-वरांचा आनंद गगनात मावत नव्हता. तेवढ्यात पोलिस दारात दिसताच त्यांना धक्काच बसला. अन्‌ विवाह बंधनाच्या गाठी बांधल्या जात असलेल्या या प्रेमी युगुलांच्या आयुष्यात घडले ते अघटितच.



पुढे असे घडले, की बार्शी तहसील कार्यालयात या अल्पवयीन बाल विवाहाबाबत माहिती देण्यात आली होती. तहसील कार्यालयाने ही माहिती त्वरित बार्शी शहर पोलिस स्टेशनला कळवली. 


पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी त्वरित दखल घेतली व पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा ठाकूर, हवालदार लक्ष्मण भांगे, श्रीमंत खराडे, रविकुमार लगदिवे, मलंग मुलाणी, महिला पोलिस स्वाती डोईफोडे यांचे पथक विवाहस्थळी रवाना केले.


विवाहाची जय्यत तयारी झाली होती. विवाहाच्या रेशमी बंधनात संसार करण्यास निघालेल्या वधू-वरासह पै-पाहुणे, नातेवाईक यांना थेट पोलिस ठाण्यात आणण्यात आले. वधू-वराच्या वयाची तपासणी पोलिसांनी केली असता, वधूचे व वराचे दोघांचेही वय 19 असल्याचे निष्पन्न झाले. 


विवाह कायद्यानुसार वराचे वय 21 असणे आवश्‍यक आहे तर वधूचे 18 वर्षे. वधूचे वय कायद्यानुसार पूर्ण होते पण वराचे वय कायद्यानुसार दोन वर्षे कमी होते. 


म्हणून पोलिसांनी अखेर विवाह थांबवला. पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांनी संसार थाटण्यास निघालेल्या दोन्ही वर-वधूचे समुपदेशन केले. नातेवाईक, मित्रमंडळींना समज देण्यात आली आहे. (सकाळ)








Navradeva was the only minor in the marriage, child marriage was stopped by the police


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा