राष्ट्रवादीत धुसफुस! भालके यांच्या पत्नी की मुलाला उमेदवारी? उमेदवारीवरून संभ्रम - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १८ मार्च, २०२१

राष्ट्रवादीत धुसफुस! भालके यांच्या पत्नी की मुलाला उमेदवारी? उमेदवारीवरून संभ्रम



टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार भारत भालके  यांच्या निधनाने रिक्त असलेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी उमेदवारीबाबत राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. 


राष्ट्रवादीत उमेदवारीवरून धुसफुस सुरू असताना भाजपने ‘थांबा आणि वाट पाहा’ हे धोरण स्वीकारले आहे.सलग तीन वेळा निवडून आलेल्या भालके यांच्या परिवारातील सदस्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. 



त्याच वेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक औदुंबर ऊर्फ  अण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी राष्ट्रवादीतच विरोधी सूर लावला आहे. दुसरीकडे विधान परिषदेतील भाजपप्रणीत आमदार प्रशांत परिचारक यांनी अद्यापही भूमिका जाहीर के लेली नाही. 


शिवसेनेचे आणि सलग दोन वेळा निवडणूक लढलेले समाधान आवताडे पुन्हा उतरण्याच्या तयारीत आहेत. तसेच सेनेंकडून गेल्या निवडणुकीत माघार घेतलेल्या शैला गोडसे यादेखील इच्छुक आहेत.




पंढरपूर–मांगळवेढा विधानसभा निवडणूक नेहमीच चर्चेत राहिली.२००९ रोजी मतदारसंघ पुनर्रचनेत बदल झाला. आणि २००९ च्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले भारत भालके ‘जायंट किलर’ ठरले. पुढे २०१४ मध्ये भालके यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून सध्याचे विधान परिषद सदस्य असलेले प्रशांत परिचारक यांचा पराभव केला. 


मोदी लाटेतही भालके  विजयी झाले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये भालके यांनी काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला. भाजपने तेव्हा सुधाकरपंत परिचारक या जुन्याजाणत्या नेत्याला रिंगणात उतरविले होते, 


पण भालके यांनी हॅटट्रिक केली होती. तीन निवडणुकांमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडून येण्याचा विक्रम भालके  यांनी के ला होता. विरोधकांच्या मताचे विभाजन करणे आणि सामान्य मतदारांशी असलेली नाळ यामुळे भालके विजयी होत गेले. 


मात्र त्यांच्या अकाली निधनाने रिक्त जागेवर निवडणूक जाहीर झाली.या रिक्त जागेवर प्रमुख दावेदार भालके कुटुंबातील सदस्य आहेत. मतदारसंघातील सहानुभूतीचा फायदा भालके यांना मिळू शकतो. मात्र त्यांच्या ताब्यात असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना डबघाईला आला आहे. 


कोट्यवधीचे कर्ज आणि गेल्या हंगामात कारखाना बंद होता. यंदाच्या हंगामात सुरू झाला, मात्र पूर्ण क्षमतेने चालला नाही. या कारखान्याचे अध्यक्षपदी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र विठ्ठल कारखान्याचे संस्थापक माजी आ. कै.औदुंबर ऊर्फ अण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी विरोधाचा सूर आळवला आहे. तर राष्ट्रवादी पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. 


त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याबाबत गोधळ निर्माण झाला आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचेदेखील निधन झाले. त्यामुळे परिचारक गटाची राजकीय धुरा आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्यावर आहे. भाजप या निवडणुकीत कोणाला उभे करणार याची चाचपणी सुरू आहे. 


याबाबत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय करून उमेदवार निश्चित केला जाईल, असे आमदार परिचारक यांनी सांगितले. गेल्या दोन निवडणुकीत परिचारक यांनी मतदारसंघ बांधला आहे. 


तसेच कै. सुधाकरपंत परिचारक यांना मानणारा वर्ग आणि त्यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती याचा विचार भाजपाने नक्कीच केला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. भाजपचा उमेदवार देताना आ. प्रशांत परिचारक यांचे मत जाणून घेऊन अंतिम केला जाईल. 


परिचारक गटाकडून खासगी क्षेत्रातील ‘युटोपियन साखर कारखान्या’चे अध्यक्ष उमेश परिचारक यांचे नाव चर्चेत आहे. उमेश परिचारक हे गेली अनेक निवडणुका पडद्यामागे राहून लढलेले आणि राजकीय चाणक्य अशी ओळख आहे. 


तर दुसरीकडे समाधान अवताडे हे पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती. यात त्यांचे मताधिक्य वाढलेले आहे. अवताडे यांचा मतदारसंघाशी संपर्क आहे. शिवसेनेतर्फे शैला गोडसे यादेखील पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ दोन वेळा पिंजून काढला होता. 


मात्र युतीमध्ये ही जागा भाजपाला गेली. त्यामुळे माघार घ्यावी लागली. याचबरोबर उद्योजक अभिजित पाटील, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले इच्छुक आहेत.


राष्ट्रवादीत चुरस


राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद आणि भगीरथ भालके यांना एक गट विरोध करीत आहे. मात्र भारत भालके यांची पत्नी जयश्री भारत भालके यांच्या नावाला विरोध कोणी केला नाही. त्यामुळे त्यांचे नाव निश्चित होऊ शकते. अशा वेळी भाजपकडून एखादी महिलाच रिंगणात उतरविली जाऊ शकते. यासाठी शैला गोडसे यांच्या नावाचा भाजपने विचार के ल्यास ही पोटनिवडणूक चुरशीची होऊ शकते. (लोकसत्ता)








असा हा निवडणुकीचा कार्यक्रम


२३ ते ३० मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत


३१ मार्चला छाननी


३ एप्रिलला माघार


१७ एप्रिलला मतदान


२ मे मतमोजणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा