मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, अश्या आशयाचे निवेदन मंगळवेढा तहसीलदार स्वप्निल रावडे यांना शिवबुध्द महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे.
सध्या सोलापूर जिल्हात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पीके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफ देवून वीजबिल ही माफ करण्यात यावे. सोलापूर जिल्हा हा कमी पर्जन्यमानाच्या छायेत आहेत. दर चार वर्षातुन एकदा जिल्हात दुष्काळ पडतोय. हा आजवरचा इतिहास आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात भीमा, सीना, हरणा या तीन नद्या वाहत असल्या तरी यातील भीमा नदी वगळता सीना व हरणा या वर्षातील दहा महिने कोरड्याच असतात. सीना व भीमा नदीकाठच्या दोन किलोमीटर परिसरात ऊस व द्राक्ष शेतीवर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या पिकांवरही रोग पडत आहे. त्यामुळे बागा जळून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कितीतरी टक्के क्षेत्र जिरायत आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेती हेच आहे. पाऊस पडला तरच शेतकऱ्यांचे पोट भरले जाते. अशी विदारक स्थिती सध्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आहे.
चालू वर्षात ३० टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. नदी, नाले, विहीरी, बोअर कोरडे पडली आहेत. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी वीजेचा वापर होत नाही. तरीदेखील वीजबिल आकारले जाते. दुष्काळी परिस्थितीत सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीजबिलही माफ करावे, अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिवबुध्दच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा विजयालक्ष्मी मुढे, मंगळवेढा तालुकाध्यक्षा किर्तीताई अशोक सुतार, मंगळवेढा शहराध्यक्षा रेखाताई भंडारे, ओ.बी.सी.शहराध्यक्षा आयेशा शेख, रूपाली यादव, अशोक सुतार इत्यादी उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा