सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू;मैदानी चाचणीसाठी लक्ष्य करिअर अकॅडमी सज्ज - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू;मैदानी चाचणीसाठी लक्ष्य करिअर अकॅडमी सज्ज




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली सैन्यदलाची भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यातील ५ केंद्रांमार्फत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे बेरोजगारांना सैन्यदलात भरती होण्याची संधी मिळणार आहे. सैन्यदलातील विविध पदांसाठी युवकांना अर्ज करता येणार आहे. दहावी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या युवकांना या मुळे चांगली संधी निर्माण झाली आहे.यासाठी सातारा येथील लक्ष्य करीअर अकॅडमी मध्ये मैदानी चाचणी साठी सज्ज झाले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

लष्कर भरतीचे राज्यात पाच भरती केंद्र (आर्मी रिक्रुटिंग ऑफिस)आहे. या केंद्रामार्फत सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. भरतीमध्ये सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क, स्टोअर किपर, सोल्जर नर्सिंग असिस्टंट, सोल्जर ट्रेड्समन या पदांचा समावेश आहे.

यासाठी नोंदणी १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारांची कागदपत्रे तपासणे, मैदानी चाचणी, दि. ४ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत बीड मधील सैनिक विद्यालयात होणार आहे. 

पुणे सैन्य भरती केंद्राच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर या ५ जिल्ह्यातील उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येईल.

त्याचप्रमाणे मुंबई सैन्य भरती केंद्रामार्फत आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. १३ आॅक्टोबरला सुरू झालेली ही नोंदणी २७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांची प्रत्यक्ष कागदपत्रे व मैदान चाचणी १३ ते २३ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील मुंब्रा येथे अब्दुल कलाम आझाद स्पोटर्स स्टेडियम येथे सुरू होणार आहे. या मुंबई केंद्रांतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या ६ जिल्ह्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.

औरंगाबाद केंद्रामध्ये आॅनलाईन नोंदणी ५ नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. ती १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांची कागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष मैदानी चाचणी ४ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे होणार आहे. तसेच कोल्हापूर भरती केंद्र, नागपूर भरती केंद्राची सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या शारीरिक चाचण्या आहेत. या चाचणींमध्ये पदनिहाय वेगवेगळ्या शरीरिक चाचण्या होतील. यामध्ये उंची, छाती, वजन आदी मोजमाप महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच, १६०० मीटर धावणे, पुलअप्स काढण्यासाठी स्वतंत्र गुण ठेवण्यात आले आहेत.

कागदपत्र तपासणीमध्ये मूळ कागदपत्रासह दोन प्रमाणित केलेल्या झेरॉक्स, नोंदणी केल्यानंतर मिळणारे अ‍ॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्र, वर्तणूक दाखला, चारित्र्य दाखला, आॅफिडेव्हीट आदी कागदपत्रे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचणीमध्ये दृष्टीदोष, दात, हिरड्या, टॅट्यू आदीची तपासणी केली जाते. यामध्ये, पात्र झाल्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ५० प्रश्नांना १०० गुण ठेवण्यात आले आहे. या लेखी परीक्षेसाठी ६० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. परीक्षेत ३० गुणांसाठी सामान्य ज्ञान, ३० गुणांसाठी विज्ञान तंत्रज्ञान, ३० गुणांसाठी गणित, १० गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा समावेश होतो.

याबाबत सातारा येथील 'लक्ष्य करिअर अकॅडमी'चे प्रमुख प्रा.शंकरराव खापे यांनी मंगळवेढा टाईम्सशी बोलताना सांगितले की, 

सैन्यभरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन नोंदणी आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराने संबंधित भरती केंद्र आणि नोंदणीसाठी आवश्यक कालावधी समजून घ्यावा. त्यानंतरच भरतीचे परीपूर्ण नियोजन करावे. मैदानी चाचणीचे बारकावे समजून घेतल्यास सैन्यभरतीमध्ये उमेदवारांना यश मिळेल. मात्र, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील खापे यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा