डॉ.मर्दा हॉस्पिटल अवैध गर्भपात प्रकरणी त्या दोघा डॉक्टरांना पाच दिवसांची पोलिस कोठडी - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

डॉ.मर्दा हॉस्पिटल अवैध गर्भपात प्रकरणी त्या दोघा डॉक्टरांना पाच दिवसांची पोलिस कोठडी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील डॉ.मर्दा नर्सिंग होममधील तीन अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सातारा येथून सोनोग्राफी करणारे डॉ.विलास दिगंबर सावंत (वय 52 रा.म्हसवड) तसेच व एजंट सुहास बाबर (रा.येडे ता.कडेगाव जि.सांगली) या दोघांना अटक केली. त्यानंतर न्यायाधीश जी.एम.चरणकर यांनी आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814



येथील कुंभार गल्लीत डॉ.श्रीकांत मर्दा यांचे मर्दा नर्सिंग होम व एक्स रे क्लिनिक या नावाचे रुग्णालय आहे. येथे अवैधरित्या गर्भपात होत असल्याची गोपनीय माहिती डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांच्यासह दि.11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी छापा टाकला. यावेळी तेथे तीन महिलांना गर्भपात करण्यासाठी कमरेच्या खाली इंजेक्शन दिल्याने त्या विव्हळत पडल्या होत्या. पोलिसांनी अधिक चौकशी करून ड्रॉवरमध्ये ठेवलेले 71 हजार रुपये जप्त केले होते.

डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन पथकांव्दारे गोपनीय माहितीच्या आधारे सातारा जिल्हयातील म्हसवड येथे जावून येथील दोघांना ताब्यात घेतले. संचित हॉस्पीटल येथे डॉ.विलास सावंत यांनी राणी प्रकाश गोडसे या महिलेची सोनोग्राफी करून मुलगी असल्याचे सांगितले होते. तर एजंट डॉ.सुरज बाबर (रा.येडे,ता.कडेगाव) यांनी संबंधित महिलेला त्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी वरील दोघा आरोपींना अटक करून न्यायाधीश जी.एम.चरणकर यांच्या समोर उभे केले असता सरकारी वकिल अ‍ॅड.बनसोडे व तपासिक अंमलदार पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी आणखी किती महिलांची सोनोग्राफी केली आहे याची कसून चौकशी करावयाची असल्याने पोलिस कोठडीची मागणी केली. सरकार पक्षाच्यावतीने मजबूत बाजू मांडल्याने न्यायालयाने आरोपींना 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीच्यावतीने अ‍ॅड.राजेश चौगुले व अ‍ॅड.धनंजय हजारे यांनी बाजू मांडली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा