टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीची फेरपरीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारने अनुकूल भूमिका घेतली असून कोरोना संकटामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नव्हती, त्यांनाच या परिक्षेला बसण्याची संधी दिली जाऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी झालेल्या एका खटल्याच्या सुनावणीवेळी ज्यांची परीक्षा चुकली आहे, त्यांच्यासाठी फेरपरीक्षा घेण्याचा विचार सुरु असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.
चालू वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचे संकट उद्भभवले होते. त्याचा परिणाम विविध प्रकारच्या परिक्षांवर झाला होता.
कोरोना संकट व लॉकडाउनमुळे असंख्य विद्यार्थ्यांना इच्छा असूनही युपीएससीची परीक्षा देता आली नव्हती. परीक्षा देता न आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार व युपीएससी आयोगाला सल्ला दिला. कोरोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले.
यावर परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र आणि युपीएससीच्या विचाराधीन आहे, असे केंद्राने स्पष्ट केले. सदर याचिकेवरील पुढील सुनावणी ११ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा