मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-
मंगळवेढा येथून किनवट येथे मुख्याधिकारी म्हणून निलेश देशमुख यांची बदली झाली होती. मात्र देशमुख हे किनवट नगर परिषदेमध्ये रुजू न झाल्यामुळे शासनाने त्यांना निलंबित केले आहे.
शासनाच्या नगर विकास विभागाने मुख्याधिकारी निलेश देशमुख यांच्या निलंबनाचा आदेश आज दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून निलेश देशमुख हे काम पाहत असताना नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी त्यांच्या विरोधात नगर विकास विभागाच्या सचिवाकडे लेखी स्वरूपात तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीमध्ये त्यांनी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत असताना मुख्याधिकारी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत असल्याचे तक्रार नोंद करण्यात आली होती.
राज्य सरकारने काही अधिकार नगराध्यक्षांना दिले आहेत. त्या अधिकारांची अंमलबजावणी करत असताना जाणीवपूर्वक कामकाजात अडथळा आणून काम न करू देण्याच्या भूमिकेमुळे नगराध्यक्ष अरूणा माळी यांनी रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काहीच दिवसात मुख्याधिकारी निलेश देशमुख यांची ४ डिसेंबर २०१८ रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट नगर परिषदेमध्ये बदली झाली होती. या बदलीने देशमुख हे त्याठिकाणी कामावर रुजू झाले नाहीत. यानंतर २६ डिसेंबर पूर्वी रुजू न झाल्यास त्यांची अनुपस्थिती हे अनाधिकृत गैरहजरी म्हणून समजण्यात येईल असे पत्र त्यांना शासनाकडून देण्यात आले. या नंतर सदर कालावधी सेवाखंड म्हणून ग्राह्य धरून शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा