मंगळवेढ्यात मतदानासाठी रात्री साडे दहापर्यंत लागल्या मतदारांच्या रांगा - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढ्यात मतदानासाठी रात्री साडे दहापर्यंत लागल्या मतदारांच्या रांगा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

व्हीव्हीपॅट यंत्र संथ गतीने चालत असल्यामुळे लवंगी (ता.मंगळवेढा) येथे रात्री साडेदहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. तर हुन्नुर आणि निंबोणी या दोन्ही ठिकाणी व्हीव्हीपॅटमध्ये झालेला तांत्रिक बिघाड वगळता तालुक्यांमध्ये सर्वत्र शांततेत मतदान झाले.

यंत्र संथ चालत असल्यामुळे शेतीच्या आणि घरगुती कामासाठी काही मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. काल रात्री झालेल्या पावसामुळे सकाळी संथ गतीने मतदान सुरू होते; दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली. 

निंबोनी आणि हुन्नुरमध्ये दुपारच्या सुमारास व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल दोन तास मतदारांना रांगेत तिष्ठत राहावे लागले. दुसऱ्या यंत्रांची सोय करेपर्यंत बराच वेळ गेला. त्यामुळे मंगळवेढा शहरातील काही केंद्रांसह खुपसंगी, हुन्नुर, भाळवणी, निंबोनी, लवंगी, मारापूर आणि आंधळगाव या गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिली.

भाजपा-शिवसेना महायुतीचे सुधाकर परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके, अपक्ष उमेदवार समाधान अवताडे, काँग्रेसचे शिवाजी काळुंगे या मंगळवेढा तालुक्यातील उमेदवारांमध्येच चौरंगी लढत झाली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा