मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
उसने घेतलेले पैशापोटी दिलेला चेक न वठल्याप्रकरणी व्दारकेश उर्फ दादा दिनकर सुर्यवंशी याला मंगळवेढयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश जी.एम.चरणकर यांनी एक महिना तुरुंगवास,18 लाख रुपये नुकसान भरपाई व ही नुकसान भरपाई दोन महिन्याच्या आत न दिल्यास सात दिवसाची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,व्दारकेश उर्फ दादा दिनकर सुर्यवंशी(रा.भुई-माने गल्ली,मंगळवेढा)हा जमीन खरेदी विक्रीचा एजंट म्हणून काम करतो. त्याला जमिन व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने खूप वर्षापासून मैत्रीचे असलेल्या संबंधातून फिर्यादी दिगंबर दगडू भगरे यांचेकडे 16 लाख रुपये देण्याची मागणी केली असता फिर्यादीने त्याला 16 लाख रुपये दिले.तेव्हा आरोपीने फिर्यादीला शंभर रुपयांच्या स्टँपवरती 16 लाख रुपये रकमेची उसनवार पावती नोटरी करून दिली.ही उसनवार रक्कम दोन महिने ठरलेली मुदत संपून गेली तरीही त्याने परत केली नाही. त्यावेळेस फिर्यादीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने रतनचंद शहा सहकारी बँक,मंगळवेढा शाखा पंढरपूरचा चेक स्वतः सही करून फिर्यादीच्या नावे दिला व चेक वठण्याची हमीही दिली.
त्यावेळेस फिर्यादीने सदरचा चेक मंगळवेढा येथील लोकमंगल बँकेत भरला असता खातेवर रक्कम अपुरी असल्याचा शेरा मारून परत आला.त्यावेळेस फिर्यादीने त्याला वकिलामार्फत नोटीस दिली व मुदतीत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम 138 प्रमाणे मंगळवेढा येथील न्यायालयात फौजदारी केस केली.
यात फिर्यादीने दोन साक्षीदार स्वतः व भाऊ यांना तपासले. त्यात फिर्यादीकडे त्याची वडिलार्जीत जमिन विकल्याने 19 लाख रुपये आले होते. त्यातीलच 16 लाख रुपये आरोपीला दिल्याचे शाबीत केले. यात आरोपीने बचावात उसनवार पावती नोटरी अॅड.व्ही.आर.करंदीकर यांना तपासले असता त्यांच्या साक्षीवरूनही आरोपीने 16 लाख रुपये घेतल्याचे शाबीत झाले.
यात फिर्यादीच्या वतीने केलेल्या युक्तीवादात,चेक, अनादर पत्र,नोटीस,उसनवार पावती या गोष्टी फिर्यादी पक्षाने शाबीत केल्याचे तसेच आरोपीने खातेवर रक्कम शिल्लक नसतानाही 16 लाख रुपयांचा खोटा चेक देवून कलम 138 प्रमाणे गुन्हा केला असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा करावी असा युक्तीवाद करण्यात आला.
तर आरोपीच्या वतीने सदरची रक्कम न घेतल्याचा युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने फिर्यादीचा युक्तीवाद ग्राहय मानून आरोपी व्दारकेश सुर्यवंशी याला एक महिने तुरुंगवास,18 लाख रुपये नुकसान भरपाई व ही नुकसान भरपाई न दिल्यास सात दिवसाची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
यात फिर्यादीच्यावतीने अॅड.सुजय तुकाराम लवटे(मंगळवेढा),तर आरोपीच्यावतीने अॅड.राजेश चौगुले,पंढरपूर व अॅड.आय.एम कडगे यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा