मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार भारत भालके यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आ.भारत भालके यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मंगळवेढा उपसा सिंचन योजना , पंढरपूर एमआयडीसी आणि पंढरपूर - मंगळवेढ्यातील प्रलंबित विकासकामे प्राधान्याने मार्गी लागतील ,अशी अपेक्षा आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक केलेल्या भालकेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी कोणतीही नवीन आश्वासने दिलेली नाहीत. १० वर्षांत भालके यांनी विधानसभेत अनेक प्रश्नांच्या संदर्भात सातत्याने आवाज उठवला परंतु त्यांच्याकडे पक्षीय भूमिकेतून पाहिले गेल्याने कामे होऊ शकली नाहीत. आता शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी होत आहे . राज्यातील गेल्या चार दिवसांतील राजकीय घडामोडींच्या वेळी आ.भालके यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
परंतु आ.भालके यांनी कोणताही वेगळा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत आमदार भालके यांचा मंत्रिपदासाठी प्राधान्याने विचार होईल.
आ.भालके यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण आहे. त्याचबरोबर त्यांचे उत्तम वक्तृत्व आणि सभागृहातील गेल्या १० वर्षांतील कामाचा अनुभव या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल .
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपरक उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सुशिक्षित बेकार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे एमआयडीसी उभारून तिथे उद्योग व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन दिले पाहिजे. पाणी , रस्ते , रेल्वे सेवा आणि कुशल कामगार मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने एमआयडीसीमध्ये नवउद्योजक उद्योग सुरू करतील आणि तिथे गरजू तरुणांना काम मिळू शकेल.
आता महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आ.भालके यांना मतदारसंघातील गेल्या काही वर्षांतील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावता येऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा