गेल्या तीन वर्षांपासून एकत्रित (प्रेमसंबंधातून लिव्ह इन रिलेशनशिप) राहत असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी वासुद रोड,सांगोला येथे घडली आहे. याबाबत प्रेयसीच्या तक्रारीवरून श्रीकांत रामकृष्ण दुधाळ (रा. खवे, ता.मंगळवेढा) व पप्पू माने या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
सांगली येथील 26 वर्षीय युवती व श्रीकांत रामकृष्ण दुधाळ (रा.खवे, ता.मंगळवेढा) यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. श्रीकांत दुधाळ हा ट्रकचालक म्हणून सांगली मार्केट यार्ड येथे काम करीत होता. श्रीकांत दुधाळ व युवती गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. 1 नोव्हेंबर रोजी श्रीकांत दुधाळ याने आई-वडिलांच्या इच्छेखातर लग्न केले असल्याचे युवतीस सांगितले. माझे लग्न झाले असले तरी तुझ्याशी लग्न करणार आहे, लग्न झालेल्या बायकोस फार दिवस नांदवणार नाही, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे युवतीस श्रीकांत दुधाळ वारंवार सांगत होता. यावरून युवतीत व श्रीकांत दुधाळ या दोघांत वारंवार भांडणे होत होती.
29 नोव्हेंबर रोजी श्रीकांत दुधाळ याने प्रेयसीस तू सांगोला येथील बसस्थानकावर थांब, मी तुला भेटायला येतो, असे सांगितले. सांगोला येथील बसस्थानकावर श्रीकांत दुधाळ व त्याचा मित्र पप्पू माने हे दोघेजण आले. पप्पू माने याने आता रात्र भरपूर झाली आहे. त्यामुळे आपण माझ्या घरी जाऊया, असे म्हणून तिघेही दुचाकीवरून वासुद रोडने निघाले. वासुद रोडवरील एका निर्जनस्थळी दुधाळ याने अत्याचार केला असता, तिने त्यास नकार दिला. त्या वेळी श्रीकांत दुधाळ याने प्रेयसीचा हाताने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत दुधाळ हा पप्पू माने यांच्याकडून पांढऱ्या रंगाची वायर घेऊन प्रेयसीचा गळा आवळू लागला. त्या वेळी प्रेयसीने प्रतिकार करून सुटका करून घेतली. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर मी जीव देईन, अशी धमकी श्रीकांत दुधाळ याने दिली.
याप्रकरणी प्रेयसीने प्रियकर श्रीकांत दुधाळ व पप्पू माने यांच्याविरुद्ध गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याबाबत सांगली येथील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा सांगोला पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सुरेश नलवडे तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा