हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व एकंदरीतच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. लहू नानासाहेब सातपुते, असे शिक्षकी पेशास काळिमा फासणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत माहिती अशी, की पीडित मुलगी इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे. गेले दोन दिवस तिची तब्येत ठीक नसल्याने ती शाळेला गेली नव्हती. गुरुवारी (ता. 5) सकाळी 11च्या सुमारास तिला पालकांनी शाळेत जा म्हटल्यानंतर मुलगी रडू लागली. तिने शाळेत जाण्यास नकार दिला. यावेळी पालकांनी तिची चौकशी केली असता शाळेतील प्राथमिक शिक्षक लहू नानासाहेब सातपुते हे सुटीनंतर शाळा सुरू झाल्यापासून तिला वर्गाच्या बाजूच्या ऑफिसमध्ये बोलावून घेऊन तिच्या बालमनास लज्जा वाटेल असे गैरकृत्य करीत असल्याचे मुलीने सांगितले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला मारण्याची धमकीही या शिक्षकाने तिला दिली होती. अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिचा या शिक्षकाने विनयभंग केला आहे. वारंवार अशा प्रकारचे कृत्य या शिक्षकाने केले असल्याने संबंधित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी सांगोला पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत संबंधित शिक्षकावरती भारतीय दंड संहिता कलम 354, 354 (अ) व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,12 व 42 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शिक्षकास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 9 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वसखडे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा