मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पाटण तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी घडलेल्या नऊ गुन्ह्यांमधील 18 तोळे सोन्याचे दागिने व दुचाकी असा सात लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन सहकार्यांना ताब्यात घेण्यात पाटण पोलिसांना यश मिळाले आहे. अल्पावधीतच तपास करून मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात दाखवलेली तत्परता लक्षात घेऊन याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना बक्षीस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सौ. तृप्ती सोनवणे उपस्थित होत्या. धीरज पाटील म्हणाले, अटक केलेल्या संशयितांनी अशाप्रकारे नऊ ठिकाणी गुन्हे केले आहेत. त्यापैकी पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन तसेच कराडमधील एक तर कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, ता. हातकणंगले, वाठार ता. हातकणंगले, कोडोली, येळावे, अशा पाच व एकूण नऊ ठिकाणी हे सोन्याचे दागिने लंपास करण्याचे काम या आरोपीने केले होते. यापैकी पाटण तालुक्यातील एका गुन्ह्यातील दौलतनगर मरळी येथील वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पालक बैठकीसाठी फिर्यादींची मुलगी कु. रिद्धी वय वर्षे 13 हिचेसोबत परत जात असताना चोपदारवाडी गावाजवळून हा आरोपी एका दुचाकीवरून मागून येवून त्याने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे व एक तोळ्याचे मिनी गंठण दोन्ही मिळून सुमारे 61 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर संबंधित फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून व आरोपीच्या वर्णनानुसार पाटण पोलीसात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या वर्णनावरून आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजद्वारे फोटो प्राप्त केला.
गोपनीय पद्धतीने आरोपीची दुचाकी व त्याचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये तो आंबेघर ता. पाटण येथील जावई असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हा सराईत गुन्हेगार लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय 28, रा. चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जिल्हा सांगली) हाच असल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीच्या घरी जाऊन तपास केला मात्र तो मिळून आला नाही. परंतु तो वापरत असलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर वारंवार या आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता तो सातत्याने आपली ठिकाणे बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासात त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार नऊ गुन्ह्यांमधील 18 तोळे सोन्याचे दागिने यात जप्त करण्यात आले. त्याला या चोरीत मदत करणार्या अजिंक्य विजय मळणगावकर रा. आष्टा ( सांगली ) याच्यासह अजून एक अशा एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा