मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
महाविकास आघाडी'च्या माध्यमातून राज्यात शिवसेना सत्तेच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. मंत्रीपद मिळालेल्या तानाजी सावंत यांनी पक्ष शिस्तीचा शिरस्ता मोडल्याने जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. आता मंगळवेढा तालुक्यातील निवडी होणार असल्याने तालुक्यातील शिवसैनिकांच्या नजरा या निवडीकडे लागून राहिल्या आहेत आणि त्या कधी होतात, याकडे पदाधिकार्यांचे लक्ष लागून आहे.
तानाजी सावंत यांनी जिल्ह्यातील शिवसेनेवरची पकड मजबूत केली होती. त्यावेळी मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेची निवड त्यांच्या मर्जीतील लोकांना विचारात घेऊन करण्यात आली असल्याची चर्चा तालुक्यातील शिवसैनिकांमधून होत असली तरी जिल्ह्यातील बहुतांश भागावर सावंत यांच्या विचारातील लोकांना शिवसेनेत काम करण्याची संधी देण्यात आली होती.
मंगळवेढा तालुक्यात 25 वर्षांपासून काही अपवाद वगळता प्रा. येताळा भगत यांनी शिवसेनेचे तालुकापद भूषवले होते. एक वेळेस त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असो किंवा शिवसेनेचा दसरा मेळावा याशिवाय शिवसेनेचे आंदोलन, रास्ता रोको यामध्ये शिवसेना सक्रिय असायची. 2014 सली महायुतीचे सरकार आले. यानंतर मंगळवेढा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये वास्तविक पाहता सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पक्षसंघटन मजबूत करण्याची संधी मिळाली असतानादेखील म्हणावे असे प्रयत्न मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेचे पक्ष बांधणीसाठी झालेले पहायला मिळाले नाहीत. यामुळे सावंत यांच्या विचाराने नेमलेल्या पक्षाच्या पदाधिकार्यांनी शिवसेनेच्या विचाराने काम करत असताना कशा पद्धतीने काम केले पाहिजे., याबाबतची माहिती नियुक्त केलेल्या पदाधिकार्यांना नसल्याने त्यांच्याकडून भरीव कामगिरी झालेली पहायला मिळाली नाही. त्यामुळे जुने निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेनेच्या कामाची पद्धत व विचारधारेशी प्रामाणिक असणार्या लोकांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी श्रेष्ठींकडे गळ घालत आहेत.
मंगळवेढा तालुक्याचे तीर्थक्षेत्र विकास यासह उपसा सिंचन योजना, म्हैसाळचे पाणी यासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना व विद्यमान राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून विद्यमान सरकारच्या काळात प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी असणार असल्याने सध्या लवकरात लवकर तालुकास्तरीय पदाधिकार्यांच्या निवडी करणे गरजेचे झाले आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली. त्यानुसार विभागवार मंत्रिपदाचे वाटप करण्यात आल्याने आ. तानाजी सावंत यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अनेक ठिकाणी राजीनामे दिले. नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या निवडीत सावंत गटाने भारतीय जनता पक्ष सोबत हात मिळवणी करत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळवल्याने उस्मानाबाद सोलापूर येथील शिवसैनिकांच्या मनात उद्रेक निर्माण झाला. त्याचे तीव्र पडसाद शिवसेनेच्या विभागातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनावर झाल्याने शिवसेनेतून सावंत यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली. यावर तात्काळ मुंबई येथे बैठक पार पडली व सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून पुरुषोत्तम बरडे यांची निवड झाल्यानंतर आता प्रत्येक तालुक्यातील तालुकाप्रमुख सह इतर पदाच्या निवडीकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा