मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
।माजी सहकारमंत्री तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आता 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
कोरे यांनी यापूर्वीही आमदार देशमुख यांच्या विरोधात नियोजित लोकमंगल दूध भुकटी प्रकल्पासाठी प्रकल्प होण्याआधीच शासकीय अनुदान उचलले, अशी तक्रार करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी आमदार देशमुख यावर त्यांनी गंभीर आरोप केले होते. कोरे यांच्या याचिकेमुळे त्या वेळी देशमुख यांच्यावर या प्रकल्पाचे अनुदान शासनाला परत करण्याची नामुश्की ओढावली होती.
कोरे यांनी आता आमदार देशमुख यांच्या निवडीलाच आव्हान दिले आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोरे यांनी देशमुख यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. महापालिकेच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण करून देशमुख यांनी घर बांधल्याची त्यांची तक्रार होती. हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे. या तक्रारीच्या अनुषंगानेच त्यांनी आमदार देशमुख यांच्या आमदारकीला आव्हान दिले आहे. यासंबंधीची याचिका त्यांनी गेल्या महिन्यात ४ डिसेंबरला उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा