महाविकास आघाडीचे सोलापूर, नगरला पहिले "गिफ्ट' - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

महाविकास आघाडीचे सोलापूर, नगरला पहिले "गिफ्ट'


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या या सरकारने सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "गिफ्ट' दिले आहे. अनेक दिवसांपासून सीना नदीत पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. यासाठी सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समित्या स्थापन केल्या. नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती. अखेर या मागणीला काही प्रमाणात यश आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील खडकी (ता. करमाळा) येथील सीना नदीवरील बंधाऱ्यात कुकडीचे पाणी सोडण्यात आले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता या पाण्याने बंधारा भरून खालीही पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
"उजनी'प्रमाणेच "फिरकी जार'चेही पाणी घातकच
नदीची स्थिती

अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी सीना नदी करमाळा तालुक्‍यातील खडकी येथे सोलापूर जिल्ह्यात येते. या नदीवर करमाळा तालुक्‍यात खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथे चार कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यानंतर खाली कोळगाव धरण आहे. या नदीच्या पाण्याचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यासह उस्मानाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयोग होतो. मात्र, खडकी ते कोळगावपर्यंत या नदीत पाणीच राहात नाही. त्यामुळे नदी असूनसुद्धा शेती करणे अवघड होते. कोळगाव धरणात काही प्रमाणात पाणी राहते; मात्र बंधाऱ्यात पाणी येण्यासाठी स्रोत नाही. त्यामुळे कुकडीचे पाणी येथील बंधाऱ्यामध्ये सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होती.

खडकी बंधाऱ्यात पाणी आले; पण बंदही झाले
पावसाच्या लहरीपणामुळे नेहमीच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातच सीना नदीवर जागोजागी बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवले जात आहे. त्यामुळे खाली पाणीच येत नाही. गेल्यावर्षी तर जवळा येथील नान्नी नदीला पाणी आल्यामुळे आळजापूरपासून खाली पाणी आले. मात्र, खडकीपासून वरच्या भागात नदी कोरडी होती. आलेले पाणीही थोडे होते. त्यांनी बंधारे भरले नाहीत. त्यामुळे अजूनही या भागात दुष्काळाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मागणीमुळे खडकी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. मात्र, ते पाणी खूप कमी आहे. फक्त एक दार भरले आहे आणि ते पाणीही बंद करण्यात आले आहे. आणखी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. एक दार पाणी एक महिनाही पुरणार नाही. संपूर्ण बंधारा भरल्यास पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

खडकीत पाणी आले, आता खाली सोडा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात खडकी बंधाऱ्यात पाणी आले आहे. मात्र, हे पाणी तरटगाव, पोटेगाव, संगोबा व कोळगाव धरणापर्यंत सोडावे. नदीत पाणी येऊ शकते, हे आता सिद्ध झाले आहे. यापूर्वीही खडकी बंधाऱ्यापर्यंत पाणी आले होते; मात्र सरकारने निर्णय घेऊन करमाळा तालुक्‍यातील कायम वंचित राहणाऱ्या आळजापूर, बिटरगाव (श्री), पाडळी, बाळेवाडी, पोटेगाव, संगोबा, पोथरे, करंजे, बोरगाव, भालेवाडी, मिरगव्हाण आदी भागांसाठी खाली पाणी सोडावे, अशी मागणी कुकडी- सीना संघर्ष समितीने केली आहे. या भागात पाणी आल्यास शेतीला उपयोग होणार आहे.
यापूर्वी झाला होता निर्णय...
सीना नदीत पाणी सोडण्याबाबत माजी मंत्री राम शिंदे यांच्या काळात निर्णय झाला होता. त्यानंतर एकदा पाणीही आले होते. मात्र, आता मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यापूर्वी दीगी येथून पाणी सोडण्यात आले होते. ते खडकी बंधाऱ्यापर्यंत पोचले नव्हते. वाळूचे ढीग आणि पाण्याचा प्रवाह कमी, यामुळे पाणी पोचण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात येत आहे. आताच्या सरकारने करमाळा तालुक्‍यातील जातेगाव येथून पाणी सोडले असल्याने फायदा झाला आहे. मात्र, आणखी पाणी सोडायला हवे. फक्त देखावा म्हणून पाणी सोडायला नको, सर्व बंधारे भरले तरच याचा उपयोग होणार आहे, असे शेतकरी सांगत आहेत.
आमदार रोहित पवार, संजय शिंदेंमुळे पाणी?
सीना नदीवरील कायम दुष्काळी राहणारा भाग हा करमाळ्याचे आमदार संजय शिंदे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील आहे. या भागात पाणी सोडावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची होती. अनेक प्रचार सभांमध्ये, खासगीत येथे पाणी सोडण्याचे आश्‍वासन दोघांनीही दिले होते. त्याची सुरवात झाली असल्याचे या भागात बोलले जात आहे. मात्र, या पाण्याने सर्व बंधारे भरून घ्यावेत व त्यात सातत्य ठेवावे; अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांची नाराजी निर्माण होणार आहे, अशी चर्चा या भागात आता रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा