महाराष्ट्रात आता 'स्मार्ट' शेती प्रकल्प! - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

महाराष्ट्रात आता 'स्मार्ट' शेती प्रकल्प!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

कृषी व कृषिपूरक व्यवसायाशी निगडित सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (डचअठढ) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात बुधवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने (आयबीआरडी) सुमारे 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत करण्यात आला.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणनविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, अस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समित्यांना ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे जोडण्याची सुविधा यांचा समावेश आहे. शेतमालाचे काढणीपश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रियेद्वारे मूल्यवृद्धी करणे, ग्राहकांसाठी सुरक्षित खाद्य उत्पादित करण्यास मदत करणे, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांच्यासाठी उपजीविकेचे स्त्रोत निर्माण करणे आदी या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एक हजार रुग्णालये

सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणार्‍या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. राज्यात आता प्रत्येक तालुक्यात किमान एक रुग्णालय योजनेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात सहभागी रुग्णालयांची संख्या दुप्पट करुन सुमारे एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना त्याचा फायदा होऊन दिलासा मिळेल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा