टीम मंगळवेढा टाईम्स । सुमारे पंचान्नव हजार रुपये किमतीच्या बनावट एचडीपीई पाइपवर जैन कंपनीचे शिक्के मारून कंपनीची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील एका कंपनीसह तीन जणांवर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना सय्यद वरवडे शिवारातील एका ढाब्यावर घडली असून, यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, टेराफ्लो पाइप (रिबदा, ता. गोंधाल, जि. राजकोट, गुजरात) या कंपनीकडून बंधू इलेक्ट्रिकल, चडचण (ता. इंडी, जि. विजयपूर) येथे जैन कंपनीचे एचडीपीई जैन ट्रेडमार्क पाइप कॉपीराईट करून कंपनीचे नाव वापरून विकण्यासाठी जीजे 03/बीपी 9840 या मालट्रकमधून जात असल्याचे आम्हाला समजले.
त्यानुसार आम्ही गाडीचा शोध घेत असता, हा मालट्रक मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील एका ढाब्यावर उभा असल्याचा दिसला.
ट्रकच्या चालकाला नाव विचारले असता त्याने जीवनभाई जिलाभाई झापडा असल्याचे सांगत, टेराफ्लो कंपनी येथून पाइप भरल्याचे सांगितले. त्याच्याकडील पावत्या पाहिल्या असता त्या बनावट असल्याचे निदर्शनास आले.
त्यावरून हे पाइप आमच्या कंपनीचे नसल्याची खात्री झाल्याने व गुजरातमध्ये आमच्या कंपनीचे नकली स्वामित्व चिन्ह वापरून कंपनीची फसवणूक केल्याचे लक्षात आले.
टेराफ्लो कंपनी, जीवनभाई झापडा व हिमताराम अंबादास चौधरी (रा. चडचण) अशा तिघा जणांविरोधात व्यवस्थापक प्रकाश गोरे यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या विरोधात मोहोळ पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल देवडे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा