टीम मंगळवेढा टाईम्स । पुढच्या काही तासांत एक विलक्षण 'ग्रहयोग' साधणार आहे. शब्दशः ग्रहयोग आहे. कारण काही तासांतच आकाशात गुरू आणि शनी ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. म्हणजे जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत.
आज 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वांत लहान दिवस असतो. यंदा हा दिवस आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण याच दिवशी ही अनोखी महायुती दिसणार आहे. सूर्यास्ताच्या सुमारास ही युती दिसणार आहे.
आज रात्री आकाशात शनी व गुरू हे दोन महाकाय ग्रह अगदी जवळजवळ दिसतील. वास्तविक शनी व गुरू या दोन ग्रहांच्या कक्षेत सरासरी सहा कोटी किलोमीटरचे अंतर आहे. परंतु, त्यांची कक्षेत फिरण्याची विशिष्ट गती व आपल्या दृष्टीने त्यांचा बदललेला कोन यामुळे हे दोन्ही ग्रह आपल्याला चिटकून असल्यासारखे भासतील.
त्यालाच ग्रहांची 'महायुती' असे म्हणतात. याचदिवशी योगायोगाने वर्षातला सर्वांत लहान दिवसही आहे. यावेळी या दोन ग्रहांमध्ये फक्त ०.१ डिग्रीचे अंतर असेल.
सध्या आकाशात गुरू ग्रहाच्यावर शनी दिसतो. परंतु, गुरू ग्रह वर सरकत असल्याने सोमवारी तो शनिजवळ राहील. तो पुढेपुढे सरकत राहील.त्यामुळे सोमवारी शनी ग्रह गुरू ग्रहाच्या खाली दिसू लागेल. या दोन ग्रहांतील अंतर वाढू लागेल. वास्तविक शनी व गुरूची युती ही दर २० (१९.८५) वर्षाने होते.
परंतु, हे दोन ग्रह इतक्या जवळ येण्याची घटना ८०० वर्षांनंतर यावर्षी पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी अशी महायुती १२२६ मध्ये पाहावयास मिळाली होती.
तसे पाहता १६२३ मध्येही ही घटना घडली होती. परंतु, त्यावेळी सूर्य सानिध्यामुळे ही युती पाहता आली नाही. २० वर्षांच्या अंतराने होणारी युती यापूर्वी २८ मे २००० रोजी झाली होती. तर यापुढे ३१ ऑक्टोबर २०४०, ७ एप्रिल २०६०, १५ मार्च २०८० व १८ सप्टेंबर २१०० रोजी होईल.
त्यापैकी १५ मार्च २०८० रोजी या दोन ग्रहांमधील अंतर आजच्या इतके कमी राहील. म्हणजेच हे दोन ग्रह इतके जवळ पाहण्यासाठी पुढील ६० वर्षे वाट पहावी लागणार आहे.
सोमवारी शनी व गुरू आकाशात जवळ दिसणार असले तरी प्रत्यक्षात या दोघांत करोडो किलोमीटरचे अंतर असेल. आकाशात ग्रह जवळ दिसतात. म्हणून मानवजातीवर त्याचे कोणतेच अनिष्ट परिणाम होत नसतात.
कारण, ग्रहगोल निर्जीव स्वरूपाचे असतात व करोडो किलोमीटर दूर असतात. त्यामुळे मानवी जीवनात किंवा त्यांच्या व्यवहारात ते कोणत्याच प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने या सर्व अवकाशीय पिंडांचे निरीक्षण करून वस्तुस्थिती समजून घ्यावयास पाहिजे.
जनतेने ग्रहांविषयींचे कोणतेही गैरसमज तथा भीती मनात न बाळगता सोमवारी या दोन ग्रहांतील अंतर कसे कसे कमी होत जाते, याचे निरीक्षण करावे व या घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे
नागरिकांनी कराने निरीक्षण
दर २० वर्षांच्या अंतराने गुरू व शनी यांची युती पाहायला मिळत आली आहे. यापुढेही ती तशाच पद्धतीने होणार आहे. मात्र, ८०० वर्षांनंतर गुरू व शनी पहिल्यांदाच एवढ्या जवळ येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी यांचे निरीक्षण करावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा