सोलापूर ब्रेकिंग! विवाहासाठी 'हे' प्रमाणपत्र बंधनकारक, संचारबंदीच्या काळात यांना सवलत असणार - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

सोलापूर ब्रेकिंग! विवाहासाठी 'हे' प्रमाणपत्र बंधनकारक, संचारबंदीच्या काळात यांना सवलत असणार


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा जोर वाढू नये यासाठी प्रशासनाने सावध पवित्रा घेत आज दि.25 फेब्रुवारी ते दि.7 मार्च या काळात रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्‍लासेस पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांची शाळा सुरु राहणार आहे.


जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आदेश!


मंगल कार्यालये सुरुच राहतील पण 50 लोकांच्या मर्यादचे बंधन पाळावेच लागेल असून विवाहासाठी पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे



अत्यावश्‍यक सेवा वगळता कोणत्याही व्यक्‍तीस दि.25 फेब्रुवारी ते दि.7 मार्च या काळात रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत घराबाहेर पडता येणार नाही. दुध, भाजीपाला, फळे या जीवनावश्‍यक वस्तूंसह वृत्तपत्र सेवा आणि इतर अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांसाठी सवलत दिली गेली आहे.


सोलापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा (दहावी-बारावी वगळून) व महाविद्यालये व खासगी शिकविणी पूर्णपणे बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील अभ्यासिका, ग्रंथालये शासकीय निर्बंध पाळून 50 टक्‍क्‍यांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे.


सर्व प्रकारचे खेळाचे सामने, स्पर्धा रद्द कराव्यात; 7 मार्चपर्यंत कोणत्याही सामन्यांसाठी परवानगी नाही, सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 11 पर्यंत सुरु राहतील व त्यातील उपस्थिती मात्र 50 टक्‍केच असावी असे आदेश दिले गेले आहेत.





सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्थानक, बस स्टॅण्ड, हॉस्पिटल, प्राथर्नास्थळे) अशा ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्क न वापरता फिरणाऱ्यांना आता भरावा लागेल एक हजार रुपयांचा दंड,स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक शौचालये, बस व रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.


संचारबंदी काळात शहर- जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना परवानगी असणार आहे.मात्र, विवाहावेळी 50 व्यक्‍तींपेक्षा अधिक संख्या आढळल्यास मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई करुन गुन्हाही दाखल केला जाणार आहे. तर या काळात मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु राहणार आहेत.


मात्र, यात्रा, उरुस, उत्सवास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही खेळांचे सामने या कालावधीत घेतले जाणार नाहीत असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोना वाढणार नाही, यादृष्टीने सर्वांनी काळजी घ्यावी नियमांचे पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा