मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।
ऐकीकाळी राज्यात आदर्श सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील इतर 13 साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्याच्या साखर उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.चालू हंगामात गाळपास आलेल्या उसाचे विठ्ठल कारखान्याकडे सुमारे 39 कोटी 76 लाखांची एफआरपीची रक्कम थकीत आहे.
थकीत रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. जप्ती आदेशामुळे विठ्ठल कारखान्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.या कारवाईमुळे कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यावरही नामुष्की ओढावली आहे.
भालके गटाला अडचणीत आणणारा आदेश
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदावरून बॅकफूटवर आलेल्या भालके गटाला हा दुसरा धक्का समजला जातो. अगोदरच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला सावरण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना मालमत्ता जप्तीचे आदेश निघणे, हे पोटनिवडणुकीच्या तोंडावर भालके गटाला अडचणीचे ठरू शकते.
यामागे विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीचे गणित तर नाही अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 'या' कारखान्यांचा समावेश
सोलापूर जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांकडे 28 फेब्रुवारी 2021 अखेर पर्यंतची एफआरपीची 556 कोटी 75 लाख रुपयांची रक्कम थकीत आहेत.
ही थकीत रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अडचणीच्या काळात भगिरथ यांच्यावर जबाबदारी
पंढरपूर येथील विठ्ठल साखर कारखान्यावर गेल्या 18 वर्षांपासून भालके गटाची सत्ता आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांच्यानंतर (कै.) आमदार भारत भालके यांनी कारखान्याचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवले आहे.
मागील काही वर्षांपासून कारखान्याची आर्थिक परिस्थिती नाजकू झाली आहे. त्यातच आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे.
यापूर्वी जीएसटीप्रकरणी खाती सील
दरम्यानच्या काळात कारखान्याकडे 39 कोटी 76 लाखांची एफआरपीची रक्कम थकल्याने साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
यापूर्वी विठ्ठल कारखान्याने जीएसटीचे सुमारे 15 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याची बॅंक खाती सील केल्याचा प्रकार ताजा असतानाच थकीत ऊस बिलापोटी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याने अध्यक्ष भगिरथ भालके यांच्या समोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
शिवाय या जप्तीच्या कारवाईमुळे विठ्ठल कारखान्याने आजपर्यंत मिळवलेली आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा देखील धुळीला मिळाल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे. (Source : सरकारनामा)
साखर आयुक्त कार्यालयाकडून विठ्ठल कारखान्याला कोणतेही मालमत्ता जप्त करण्यासंदर्भातील अधिकृत पत्र मिळालेले नाही. थकीत रक्कम देण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच एफआरपीची थकीत रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल.-भगिरथ भालके, अध्यक्ष, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा