गुलाल उधळणार! समाधान आवताडे 20 हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

गुलाल उधळणार! समाधान आवताडे 20 हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार


टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघातील प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, त्याच बरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघावा यासाठीच मतदार संघातील मतदारांनी माझ्यावर व भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून मतदान केले आहे.


पोटनिवडणूकीत किमान 20 हजाराहून अधिक मताधिक्यांनी माझा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बोलताना व्यक्त केला.


पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरती शनिवारी पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत चुरशीने 66.15 टक्के मतदान झाले. मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी गुलाल आपलाचं असल्याचा ठामपणे दावा ही केला.


आवताडे म्हणाले की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणुक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली. मागील अनेक निवडणुकांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीचे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच भारत भालकेंना येथील जनतेने तीन वेळा निवडून दिले.



परंतु या भागातील शेतकऱ्यांना शेतीचे पाणी मिळाले नाही. पुन्हा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या भागाला पाणी देवू असे सांगितले. याचवेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनाही या भागात येवून केंद्र सरकारच्या निधीतून पुढील तीन वर्षात ही अपूर्ण योजना पूर्ण करु असे वचन दिले.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर येथील मतदारांनी विश्वास ठेवून भाजपला मतदान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदे यांच्या विषयी विचारले असता, ते म्हणाले की, आमदार संजय शिंदे यांनी औपचारिकता म्हणून त्यांनी भूमिका पार पडली. त्यांच्यामुळे असा कोणताही फरक पडला नाही.


मंगळवेढा तालुक्यातील मतदारांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, भाजपला मतदान केले आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे.


पंढरपूरमध्ये भाजप आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेतली. त्यामुळे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून चांगले मतदान झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील प्रभावीपणे प्रचारयंत्रणा राबवली. त्यांचीही मोठी मदत झाली असे आवताडे म्हणाले.


सिध्देश्वर आवताडे यांच्यामुळे फटका किती बसेल या विषयी ते म्हणाले ''निकालानंतर आपणाला कळेलच, त्यांची उमेदवारी मी फारसी मनावर घेतली नाही. मंगळवेढा शहर व तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी भाजपला मतदान केले आहे. 2 मेच्या निकालात माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.(स्त्रोत:सरकारनामा)








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा