टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे आणि परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत रॅपिड ऍटिजेनवर 2764 व आरटीपीसीआरच्या झालेल्या 584 टेस्टमध्ये 74 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून, त्यातील आठ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.
अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने भोसे येथील ग्रामस्तरीय समितीने तातडीची बैठक घेऊन गाव, वाड्या- वस्त्यांवरील प्रत्येक कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरवात केली आहे.
पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना भोसे येथील केंद्र शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्याची मोहीम झपाट्याने सुरू केली असून, जे ग्रामस्थ कोरोना चाचणी करण्यासाठी व पॉझिटिव्ह सापडल्यानंतर विलगीकरण कक्षात राहण्यास तयार होत नसतील तर त्यासाठी प्रसंगी पोलिस बळाचा वापर करण्याचाही निर्णय ग्रामस्तरीय समितीने घेतला आहे.
भोसे हे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील मुख्य बाजारपेठेचे केंद्र असल्याने या गावामध्ये आसपासच्या आठ- दहा खेड्यांतील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अचानक कोरोना रुग्णवाढीचा मोठ्या प्रमाणात येथे उद्रेक झाला असून, काही ग्रामस्थांनी खासगी उपचार घेऊन सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मिरज, विजयपूर व सोलापूर आदी ठिकाणी बऱ्याच रुग्णांना दवाखान्यात भरती केले आहे.
त्यातील काही जणांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून अजूनही काहीजण खासगी दवाखान्यांत मृत्यूशी झुंजत असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सोमवारी भैरवनाथ मंदिर परिसरात माजी सभापती तानाजी काकडे, विद्यमान उपसभापती सूर्यकांत ढोणे, तालुका वैद्यकीय अधिकारी नंदकुमार शिंदे, उपसरपंच बाळासाहेब काकडे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब निकम, सतीश भोसले, अशोक भगरे, भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी गाव कामगार तलाठी जयश्री कल्लोळे, ग्रामविकास अधिकारी अविनाश मोरे, कृषी सहाय्यक फराटे आदींनी तातडीची बैठक घेतली.
भोसे गावात दररोज पॉझिटिव्ह सापडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने तसेच त्रास होऊनही भीतिपोटी बरेच रुग्ण सरकारी दवाखान्यात न तपासता घरीच बसून असल्याने अशा रुग्णांना मार्गदर्शन करून तातडीने तपासणीसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्राची टीम तयार करणे, त्याचबरोबर गावातील खासगी डॉक्टरांची मदत घेऊन तातडीने गावातील प्रत्येक कुटुंबाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर आजपर्यंत पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण विलगीकरण कक्ष नसल्याने गावामध्ये मोकाट फिरत असल्याने त्याचा इतर ग्रामस्थांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने तातडीने भोसे केंद्र शाळेत विलगीकरण कक्ष तयार करून पॉझिटिव्ह सापडलेल्या प्रत्येक रुग्णास किमान सात दिवस तरी सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
ज्या कुटुंबातील सदस्य कोरोना चाचणी करण्यास नकार देतात व विलगीकरण लक्षात राहण्यास नकार देत असतील तर अशा कुटुंबासाठी प्रसंगी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता हा फार मोठा उद्रेक असून, अशा परिस्थितीत भोसे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने व रिक्त पदांची संख्या भरपूर असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा ताण येत असून, हा ताण कमी करण्यासाठी तातडीने वैद्यकीय अधिकारी व इतर पदे का भरली जात नाहीत, असा संतप्त सवाल काही ग्रामस्थांनी विचारत आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
भोसे येथील कोरोनाचा वाढता प्रसार व रुग्णांचे होणारे मृत्यू ही बाब मोठी गंभीर बाब असल्याने ब्रेक द चेन होण्यासाठी गावातील मेडिकल्स वगळता कुठलीही दुकाने व बॅंका, पतसंस्था येत्या 30 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वानुमते ठरले.
तालुका वैद्यकीय अधिकारी नंदकुमार शिंदे यांनी गावातील भीषण परिस्थिती सांगण्यासाठी प्रांताधिकारी मंगळवेढा यांना मोबाईलवरून संपर्क साधून वाढत्या रुग्णसंख्येबाबत तसेच होणाऱ्या मृत्यूबाबतची माहिती देऊन, भोसे येथील ही परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्याची त्याचबरोबर प्रसंगी पोलिस बळाचा वापर करून चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याची माहिती दिली.
गावामध्ये असणाऱ्या खासगी डॉक्टरांनी चाचणी न केलेल्या रुग्णांवर उपचार करू नये, आपल्या दवाखान्यात आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना चाचणीचा अहवाल बघितल्याशिवाय उपचार करू नयेत अन्यथा अशा डॉक्टरांवरही कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा तालुका वैद्यकीय अधिकारी नंदकुमार शिंदे यांनी या वेळी दिला.(सकाळ)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा