टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकिय नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. सभेसाठी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. सभांना गर्दी झाल्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढले. यास आम्ही जबाबदार आहोत अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ.स्व.भारत भालके यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भगिरथ भालके यांना भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली.
उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आ.अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,आ.गोपीचंद पडळकर, पक्ष निरीक्षक बाळा भेगडे यांनी सभा घेतल्या.
या सभेसाठी हजारोंची गर्दी झाली होती. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सभेसाठी मर्यादित पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित ठेवा येणाऱ्यांना मास्क व सुरक्षित अंतर ठेवण्याची सक्ती करा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.
मात्र याकडे दुर्लक्ष करून सभेसाठी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार जमा झाले. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होऊन कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली.
पंढरपूर तालुक्यात दररोज १५० ते १८० , तर मंगळवेढा तालुक्यात ६० ते ८० रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र आरोग्य सुविधा अपुग्या पडत आहेत. त्यामुळे सुविध देण्यासाठी प्रशासनाची धावपळ होत आहे. या सर्वाला राजकीय पक्षाचे नेतेमंडळीच जबाबदार आहेत , असा आरोप आता करण्यात येत आहे.
पोटनिवडणुकीमुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. त्याप्रमाणे निवडणूक लढविणे गरजेचे होते.
प्रचार करण्यासाठी होम टू होम, जाहीर सभा घ्याव्या लागतात. घरात बसून प्रचार करता येत नाही. निवडणुकीमुळे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, त्यामुळे हो... यास आम्ही जबाबदार आहोत असे पवार यांनी सांगितले.(स्रोत:पंढरी संचार)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा