टीम मंगळवेढा टाईम्स ।
युरोपातील सात देशांसह दुबई नेदरलॅंड येथून सोलापूर शहरात 32 तर ग्रामीणमध्ये 11 प्रवासी आले आहेत. त्यातील चार प्रवासी पुण्यात असून, त्यापैकी दोघांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
39 जणांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट अजून आले नसल्याची माहिती आरोग्याधिकाऱ्यांनी दिली.
त्या सर्व प्रवाशांना सात दिवस क्वारंटाइन राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. परदेशातून 28 नोव्हेंबर रोजी भारतात परतलेल्या प्रवाशांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 40 प्रवाशांचा समावेश होता.
रविवारी नेदरलॅंडवरून तीन प्रवासी सोलापुरात आले. आतापर्यंत माळशिरस व बार्शी तालुक्यातील प्रत्येकी चार तर मोहोळ, पंढरपूर व सांगोल्यात प्रत्येकी एक प्रवासी परदेशातून आला आहे.
प्रत्येकाच्या आधार कार्डवरील पत्त्यावरून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. पहिल्यांदा त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. आरटीपीसीआर टेस्टसाठी त्यांचे स्वॅब सिव्हिल हॉस्पिटलमधील लॅबला पाठविले असून,
त्याचे रिपोर्ट आज येतील. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही कोरोना चाचणी होईल, असेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील दिल्ली, मुंबई, हैदराबाद विमानतळावरून हे प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. 28 नोव्हेंबर व 4 डिसेंबर रोजी ते भारतात दाखल झाले आहेत. त्यांची यादी राज्य सरकारकडून महापालिका व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.
त्यानुसार सर्वांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, एकाही प्रवाशात कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. परंतु, शहरातील दोन प्रवासी पुण्यात असून ग्रामीणमधील दोन प्रवाशांशी संपर्क होऊ शकला नाही.
चिंतेची बाब म्हणजे परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची रॅपिड टेस्टदेखील केलेली नाही. दरम्यान, त्या सर्व प्रवाशांची पुन्हा एकदा पाच दिवसांनी कोरोना चाचणी केली जाणार आहे.(स्रोत:सकाळ मीडिया)
सात दिवस क्वारंटाइन राहण्याच्या सूचना
राज्य सरकारकडून सोलापूर जिल्ह्यात परदेशातून आलेल्यांची यादी प्राप्त झाली असून, त्यानुसार त्यांची अँटिजेन टेस्ट केली आहे. सर्वांचेच रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, त्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट लवकरच येईल. तोवर सर्वांना सात दिवस क्वारंटाइन राहण्याच्या सूचना केल्या आहेत.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा