नंदेश्वरमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत गोंधळ, ८१ प्रश्नपत्रिका कमी पडल्या : विद्यार्थ्यांचे हाल,पालकवर्गातून तीव्र संताप - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

नंदेश्वरमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत गोंधळ, ८१ प्रश्नपत्रिका कमी पडल्या : विद्यार्थ्यांचे हाल,पालकवर्गातून तीव्र संताप



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

शैक्षणिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेत रविवारी गोंधळ उडाला असून नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात सुरू असलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या ८१  प्रश्नपत्रिका कमी पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते.

पेपर कमी पडल्याने इंग्रजी बुद्धिमत्तेचा दुपारी ३ वाजता सुरु होणारा पेपर संध्याकाळी ५.१५ वाजता सुरू झाल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे दोन तास विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्येच बसून राहावं लागलं. परिणामी ३ तासांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना तब्बल ५ तास एकाच जागी बसावं लागलं. यामुळे पालक संतप्त झाले असून दोषी अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात इयत्ता पाचवीचे शिष्यवृत्ती केंद्र असुन दुपारी ३ वाजता सुरू होणारा इंग्रजी बुद्धिमत्ता पेपरच्या एकूण ८१ प्रश्नपत्रिका कमी पडल्याने वेळेवर सुरू झाला नाही. नंतर प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी आणून तो संध्याकाळी ५.१५ वाजता सुरू करण्यात आला शिक्षण विभागाच्या या गलथान कारभारामुळे वर्षभर तासन् तास अभ्यास करणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण आल्याने विद्यार्थी तणावात दिसत होते.

या गोष्टीचा गंभीर परिणाम नंदेश्वर केंद्रातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार असून त्यात त्यांची संपादणूक पातळी खालवण्याची शक्यता असल्याने अशा गलथान कारभार करणाऱ्या शिक्षण विभागाचे जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी अशी मागणी पालक व शिक्षक वर्गातून होत आहे.

 प्रश्नपत्रिका वाढीव न आल्याने गोंधळ


शिष्यवृत्ती परीक्षेचा आज पर्यंतचा अनुभव पाहता दरवर्षी वाढीव प्रश्नपत्रिका येतात. पण या वर्षी पत्रिका वाढीव न येता नंदेश्वर येथील परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा प्रकार घडला आहे. याची सर्व माहिती आम्ही वरिष्ठांकडे पाठविली आहे.:-लक्ष्मीकांत कुमठेकर,शिक्षण विस्ताराधिकारी













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा