मंगळवेढ्यात एकाच रात्री चार घरांची घरफोडी;६ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, २७ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात एकाच रात्री चार घरांची घरफोडी;६ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ (उन्हाळेवाडी) परिसरात एकाच रात्री अज्ञात चोरटयाने चार घरफोडया करून 6 लाख 24 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 




दरम्यान,चोरटयांनी सेवानिवृत्त मेजर यांच्या घरावर डल्ला मारून लोखंडी कपाटातील 5 लाखाच्यावर रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मोठा किमतीचा ऐवज नेला आहे.

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात आत्तापर्यंत झालेल्या एकाही चोरीचा तपास करण्यात पोलिसांना यश आले नसताना चोरटयांनीच मोठा दरोडा टाकून पोलिसांनाच चोरटयांना शोधण्याचे चोरटयांनी एक आव्हान उभे केले आहे.





या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी बाबासाहेब यशवंत जमदाडे( वय 65)हे सेवानिवृत्त माजी सैनिक असून पाटखळ उन्हाळेवाडी परिसरात शेतामध्ये त्यांचा बंगला आहे. येळवी (ता.जत) येथील त्यांची 75 आर शेतजमीन विकून 11 लाख रुपये आले होते. त्यापैकी 6 लाख 80 हजार रुपयांचा जमिन खरेदी करणार्‍या मालकाने चेक दिला होता. दि. 18 जुलै रोजी अर्बन को.ऑप.बँक येथे वटवून ती रक्कम घरी लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये मुलगा दत्तत्रय याच्या शैक्षणिक कामाकरीता आणून ठेवली होती. 




दि.25 रोजी रात्री 10.00 वा. जमदाडे कुटुंब जेवण करून घराच्या गच्चीवर खोल्यांना आतून कडी लावून झोपले होते. सकाळी फिर्यादीची पत्नी घराच्या छतावरून उठून 5.30 वा. खाली येत असताना घरामध्ये कपडे,खुर्च्या आडव्या तिडव्या पडलेल्या तसेच लोखंडी कपाट उघडलेले दृष्टीस पडले. यावरून घरात चोरी झाल्याचे फिर्यादीच्या पत्नीच्या लक्षात आल्याने त्यांनी फिर्यादीस चोरीची घटना सांगितली. यावेळी फिर्यादीने प्रत्यक्ष पाहणी केली असता कपाटात ठेवलेले 5 लाख 20 हजार तसेच दोन सोन्याच्या अंगठया तसेच पत्नीचे सोन्याचे गंठण,मिल्ट्री कँटीनमधून आणलेल्या दारूच्या बाटल्यांचा बॉक्स,सेंट बॉक्स,साबण,तेल बॉटल आदी साहित्य चोरटयांनी घेवून पोबारा केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान त्याच परिसरातील तुकाराम लक्ष्मण उन्हाळे यांच्या शेतामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट पडलेला होता. तसेच शिवाजी सुखदेव खुळे यांची मोटार सायकल क्र. एम.एच.13 ए. क्यू.9787 ही चोरटयांनी 3 कि.मी.नेवून खुपसंगी येथील पटेल वस्तीजवळ टाकून दिली.पटेल वस्तीवरील सरताज जिलानी काझी यांच्या घरात चोरटयांनी प्रवेश करून रोख रक्कम,सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. पटेल यांच्या शेजारील आलम इनामदार यांच्या घरात प्रवेश करून एक ग्रॅम सोन्याचा बदाम,लहान मुलाच्या पायातील चांदीचे पैंजण असा मुद्देमालही चोरून नेला आहे. 

घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील,पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी भेट देवून झालेल्या चोरी स्थळाची सुक्ष्म पहाणी करून घटनेमागील कारणमिमांसा जाणून घेतली

. सोलापूर येथून चोरटयांचा मागोवा घेण्यासाठी श्वान मागविण्यात आले होते. चोरटयांनी घटनास्थळापासून 3 कि.मी.वर मोटर सायकल टाकून दिली होती. तिथपर्यंत श्वान पळत गेले व जावून थांबले.त्यामुळे चोरटे हे पुढे सांगोला-मंगळवेढा महामार्गाकडे गेल्याचा कयास पोलिसांनी वर्तविला आहे.

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात आत्तापर्यंत डझनभर चोर्‍या झाल्या आहेत. एकाही चोरीचा तपास पोलिसांना लावण्यात यश आले नाही. परिणामी पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे चोरटयांचे बळ वाढत गेले असून आज पुन्हा चोरटयांनी एकाच रात्री 3ते 4 घरे फोडून धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनीच आता या कामी लक्ष घालून होणार्‍या चोर्‍यांना पायबंद घालावा अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा