मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस असे नवीन सत्ता समिकरण जुळण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात असे नवे समिकरण जुळून आले तर राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रीपदासाठी लाॅटरी लागणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आमदार म्हणून भालकेंची ओळख असल्याने त्यांना राज्यमंत्री मंडळात संधी मिळू शकते असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.
बातम्यां व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्री पदावरुन सत्तेचे घोडे अडले आहे. मुख्यमंत्री पदावरुन भाजप -सेनेमध्ये सत्तासंघर्ष अगदी टोकाला आला आहे. कोणत्याही क्षणी भाजप -सेनेची काडीमोड होण्याची शक्यता आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच शिवसेनेचे संजय राऊत यांनी ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा शिवतिर्थावर होणार असल्याचे जाहीर केल्याने शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस अशी नवी युती राज्याच्या राजकारणात पहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन सत्ता समिकरण जुळून आले तर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये पंढरपुरातून तिसऱ्यांदा विजयी झालेले राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंना संधी मिळण्याची ही अधिक शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातून माढा, पंढरपूर, आणि मोहोळ या तिन ठिकाणी राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. माढ्यातून आमदार बबनदादा शिंदे हे विजयी झाले आहेत, शिंदे यांचे वयोमान आणि त्यांच्या सततच्या प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांना संधी मिळणे जरा अवघडच आहे. मोहोळ मधून इंदापूरचे यशवंत माने हे विजयी झाले आहेत. माने-शिंदे यांच्यापेक्षा भालकेंचा दबदबा अधिक आहे. शिवाय भारत भालके हे आक्रमक म्हणून ओळखले जातात. भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारकांचा त्यांनी पराभव करत विजयाची हॅट्रीक केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सत्ता स्थापन करावी अशीच भावना पंढरपूर भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. असे झाले तर आमदार भालकेंचा मंत्रीमंडळातील समावेश नक्की मानला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा