मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विनापरवाना व्यवसाय करून अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास दूध संकलन केंद्राला (दूध डेअरी) अन्न व औषध प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने लक्ष्मी दूध डेअरची तपासणी केली असता या फर्मच्या चालकाने विनापरवाना व्यवसाय केल्याचे तसेच अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्यावर व्यवसाय बंदीची कारवाई करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ . प्रदीप राऊत यांनी सांगितले.
लक्ष्मी दूध डेअरीने ज्या अन्न व्यवसायिकांना दूध विक्री केली आहे, त्यांच्याविरुद्ध सहआयुक्त पुणे विभाग यांच्याकडे अन्नसुरक्षा कायद्याचे परवाना अट कलम १४ अंतर्गत न्यायनिर्णय दाखल करण्यात येणार असून अशा आस्थापनेविरुद्ध अन्न नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
सर्व दूध डेअरी चालकांनी अन्न सुरक्षेसंबंधित सर्व तरतुदींचे रेकॉर्ड योग्य पद्धतीने जतन करणे अपेक्षित आहे. मानवी आरोग्यास हितकारक व स्वच्छ वातावरणातच अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करणे बंधनकारक आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे आणि प्रशांत कुचेकर यांनी पार पाडली . सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा , अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत , असा इशारा पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख व सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा