मंगळवेढ्यात नवरदेवालाही  पडलीये राष्ट्रवादीची भुरळ...असा घेतला उखाणा - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

मंगळवेढ्यात नवरदेवालाही  पडलीये राष्ट्रवादीची भुरळ...असा घेतला उखाणा



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, राष्ट्रवादीने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेत सत्ता काबीज केली. या राष्ट्रवादीची आता साऱ्यांनाच भुरळ पडलेली दिसत आहे. मरवडे (ता. मंगळवेढा) येथील नीलेश गुराप्पा स्वामी या नवरदेवाने घेतलेला राष्ट्रवादीप्रेमी उखाण्याने तर सोशल मीडियावर आता चांगलाच धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे.



हा आहे उखाणा
मरवडे येथील नीलेश स्वामी यांचा विवाह रविवारी निवर्गी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथे आरती सुभाष स्वामी (येळगी, ता. जत) यांच्याशी झाला. या विवाह सोहळ्यात नवरदेव नीलेश याने "नंदीचं नाव असतंय महादेवाच्या आधी, आरतीचे नाव घेतो मी प्रचंड आशावादी... मी राष्ट्रवादी... मी राष्ट्रवादी!' असा उखाणा घेतला. हा उखाणा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने त्यास नेटिझन्सची तुफान पसंती मिळत आहे. नवरदेव नीलेश स्वामी हे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस आहेत. 
घरा-घरांतही राष्ट्रवादी 
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या 80व्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करीत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार व प्रसार प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून केला, तर देशातील प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी पोचेल, असा विश्‍वास नवरदेव नीलेश स्वामी यांनी व्यक्त केला. 
नवरदेवाने घेतला असा उखाणा...
नंदीचं नाव असतंय महादेवाच्या आधी,
आरतीचे नाव घेतो मी प्रचंड आशावादी,
मी राष्ट्रवादी... मी राष्ट्रवादी...! 



नवरीने असा घेतला उखाणा... 
नाव घे नाव घे असं म्हणताय तुम्ही,
म्हणून नाव घेते मी आत्ता...
महाराष्ट्रात आलीय पवार साहेबांची सत्ता...
अन्‌ नीलेशरावांच्या घरात आता माझीच सत्ता...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा