सोलापूर जिल्हा परिषद सभापतिपदी डोंगरे, धांडोरे, मोठे, शटगार यांची निवड;पक्षनेते, विरोधी पक्षनेता कोण ? - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

सोलापूर जिल्हा परिषद सभापतिपदी डोंगरे, धांडोरे, मोठे, शटगार यांची निवड;पक्षनेते, विरोधी पक्षनेता कोण ?



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत निवडणूक घेण्यात आली. यावेळी विजयराज डोंगरे, संगीता धांडोरे, अनिल मोठे व स्वाती शटगार यांची सभापती म्हणून निवड झाली.

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

दरम्यान या निवडीनंतर सभागृहाचा पक्षनेता व विरोधी पक्षनेत्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत.यावेळी कोणाची वर्णी लागणार याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.


उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपद देण्यात आले आहे. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांची पुन्हा याच समितीच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी स्वाती शटगार यांची, तर समाजकल्याण समितीच्या सभापतिपदी संगीता धांडोरे यांची निवड जि.प. सभागृहात निवडणुकीने झाली आहे.

मोहोळ तालुक्यातील आष्टीचे विजयराज डोंगरे यांची पुन्हा अर्थ व बांधकाम समिती सभापततिपदी निवड झाली आहे.


सांगोला तालुक्यातील कडलास गटाच्या 'शेकाप' सदस्या संगीता धांडोरे यांची समाजकल्याण समितीच्या सभापतिपदी निवड झाली आहे. याच तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अनिल मोठे यांची कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी निवड झाली आहे. ते माजी आमदार दीपकआबा साळुंके यांच्या गटातील मानले जातात.


अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटातील स्वाती शटगार यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी निवड झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील अवताडे गटाचे जि.प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडे शिक्षण व आरोग्य या दोन समितीचे सभापतिपद देण्याचा निर्णय जि.प. अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांनी घेतला आहे.






सांगोला तालुक्याला या निवडीत दोन सभापतिपदे मिळाली आहेत. अक्कलकोट तालुक्याला एक, मोहोळला एक सभापतिपद मिळाले आहे. जि.प. अध्यक्ष हे करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटातील असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे त्यांना अध्यक्षपदासाठी राजकीय पाठबळ मिळाले आहे.

त्या सहा सदस्यांनी अखेर केले मतदान

जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्हीपचा आदेश मोडल्याने माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांची पदे अपात्र करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे अपील दाखल केले होते. मात्र, या अपिलावर जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणताच निर्णय दिला नाही. त्यामुळे शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले आदींसह सहा सदस्यांनी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभापती निवडीत मतदान प्रक्रियेत सहभागी होत समविचारी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा